खडतर परिस्थितीत गुणवत्ता अधिक उजळते.. आ.सौ. श्वेता महाले.

सवणा येथे वर्गखोलीचे लोकार्पण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार संपन्न...
शहरी भागात सुसज्ज शाळा,ग्रंथालये आणि इतर शैक्षणिक सुविधांसारखी संसाधने जास्त असतात. दुसरीकडे, ग्रामीण भागात अनेकदा या संसाधनांचा अभाव असतो,ज्यामुळे या भागातील व्यक्तींना दर्जेदार शिक्षण मिळणे कठीण होते. परंतु या सर्व अडचणीवर मात करत गुणवत्ता आपले लक्ष्य शोधते,ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करते आणि शेवटी लक्ष्य प्राप्त करते.खडतर परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता अधिक जोमाने उजळते. "अशा शब्दात आ.सौ.श्वेता महाले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
    सवणा येथील जिल्हा परिषद मराठी, उच्च प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीचे लोकार्पण आज चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच याप्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
शिष्यवृत्ती परीक्षेत विदर्भातून सर्वप्रथम आलेल्या कु.किरण भुतेकर व दुसरी आलेल्या कु.कोमल शिंदे या विद्यार्थिनींचा विशेष सत्कार,तसेच इतर विद्यार्थ्यांचे कौतुक या वेळी आ.सौ.श्वेता महाले पाटील यांनी केले आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व ग्रामपंचायत भवनाचे 25 लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजनही आ.सौ.श्वेता महाले यांच्या हस्ते पार पडले.नव्या पिढीला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे हे क्षण ग्रामस्थांनीही अनुभवले
या शाळेला आणखी दोन वर्गखोल्या मंजूर केल्या आहेत.परंतु या गावातील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 450 असून वर्ग मात्र पहिली ते आठवीपर्यंतच आहेत.येथे दहावीपर्यंत शाळा व त्यासाठी नवीन इमारत पाहिजे अशी मागणी या वेळी गावकऱ्यांनी केली.
 गावकऱ्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आ.सौ.श्वेता महाले यांनी  गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून शाळेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि शासनाला प्रस्ताव सादर करावा असे निर्देश दिले. यासाठी आपण पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणू,असे आश्वासनही त्यांनी दिले. आपण आमदार झाल्यानंतर या गावात विविध विकासकामे केली आहेत. मागील निवडणुकीत मौजे सवणा येथील गावकऱ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले होते आणि या निवडणुकीतही ग्रामस्थांनी भक्कम साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार या वेळी आ.सौ.श्वेता महाले यांनी व्यक्त केले.या आनंदसोहळ्यास गटविकास अधिकारी समाधान वाघ,गटशिक्षणाधिकारी प्रकाश सपकाळ,भाजपा मंडळ अध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ,जिल्हा सरचिटणीस पंजाबराव धनवे,आर.आर. पाटील,प्रवीण वायाळ, शाळा समिती अध्यक्ष सुधाकर भुतेकर,डिगांबर जाधव, पुरुषोत्तम घडे,अनुराग भुतेकर,सरपंच रवींद्र शिरसाठ,उपसरपंच मालताबाई एखंडे,राजू भुतेकर,पोलीस पाटील अंनथा साळोख,शाळा व्यवस्थापन समिती‌सह ग्रामस्थ,महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Previous Post Next Post