घाणमोड,मानमोड व पांढरदेव वासियांसाठी आ. सौ.श्वेताताई कडून विधिमंडळात औचित्याचा मुद्दा:
चिखली मतदारसंघातील मौजे घाणमोड,मानमोड,मौजे पांढरदेव व देवदरी हा भाग ग्रामीण असूनही येथे भूसंपादनाचा मोबदला गुणांक 1 नुसार म्हणजेच कमी मिळत आहे.तो शासन नियमाने गुणांक 2 नुसार अधिक मिळावा आणि ग्रामस्थांना न्याय द्यावा,अशी मागणी आजआ.सौ.श्वेताताई महाले यांनी विधिमंडळात औचित्याच्या मुद्द्याद्वारे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.
नुकसान भरपाई देताना गुणांक एक व गुणांक दोन या दोन बाबी कशा विश्लेषित केल्या जातात याबाबत सांगताना आमदार सौ श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या,'वाजवी भरपाई आणि पारदर्शकतेचा भूमी संपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसाहत कायदा, 2013' नुसार 'गुणांक 2' म्हणजे ग्रामीण भागातील संपादित जमिनीच्या बाजारमूल्याला 2 ने गुणले जाते,ज्यामुळे मोबदल्याची रक्कम वाढते.या व्यतिरिक्त, सोलॅशियम आणि इतर फायदे मिळून एकूण मोबदला अधिक न्यायपूर्ण होतो, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना योग्य भरपाई मिळावी यासाठी ही तरतूद आहे.
चिखली मतदारसंघातील मौजे घाणमोड,मानमोड,मौजे पांढरदेव व देवदरी येथील पुनर्वसनाचा प्रश्न मागील १५ वर्षांपासून प्रलंबित असून भूसंपादन,पुनर्वसन व पुनर्वसाहत करण्यासंदर्भात शासनाचे 26 मे 2015 व 5 ऑक्टो.2021 चे परिपत्रक आहे.
5 ऑक्टो. 2021 च्या सुधारित परिपत्रकानुसार नुसार गुणांक 1 चे निकष असे आहेत...
1) ज्या जमिनी राष्ट्रीय किंवा राज्य मार्गालगत आहेत.
2) नोंदणी महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्ध केलेल्या दराच्या वार्षिक विवरणपत्रात विहीत केलेली विकास नियोजन क्षेत्रातील जमीन आणि
3) प्रादेशिक नियोजन क्षेत्रातील बिगर कृषीदर असणारी जमीन.
वरील प्रकारच्या जमिनींचा मोबदला गुणांक 1 प्रमाणे देण्यात यावा असे निर्देश आहेत.
5 ऑक्टो. 2021 च्या सुधारित शासन राजपत्रानुसार चिखली मतदारसंघातील मौजे घाणमोड, मानमोड व पांढरदेव येथील जमिनी वरीलपैकी कोणत्याही निकषात बसत नसतानाही भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देताना गुणांक 1 नुसार देण्यात येत आहे. हा भेदभाव का?असा प्रश्न आ.सौ. श्वेताताई महाले यांनी विचारला
सन 2023 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातील सिनगाव जहागीर (ता. देऊळगाव राजा) येथील लाभार्थ्यांना जमिनीचा मोबदला गुणांक 2 नुसार देण्यात आला आहे.तसेच 2024 मध्ये मौजे भालेगाव (ता. मेहकर) येथील लाभार्थ्यांना जमिनीचा मोबदला गुणांक 2 नुसार देण्यात आला आहे. त्यामुळे चिखली मतदारसंघातील लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे,अशी भावना या गावातील लोकांमध्ये निर्माण होता असल्याची खंत आ.सौ.महाले यांनी व्यक्त केली.
तरी मौजे घाणमोड, मानमोड, पांढरदेव व देवदरी येथील भूसंपादनाचा मोबदला देत असताना मौजे भालेगाव व सिनगाव यांच्याप्रमाणे गुणांक 2 नुसार देण्याविषयी संबधितांना आदेश देण्यात यावे अशी मागणी या वेळी आ.सौ.श्वेताताई महाले यांनी केली.