महेश गोंधणे -चिखली स्टार्टअप ही लोकचळवळ व्हावी, असे मत आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केले. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स फॉर इंक्लुसिव्ह बिझनेस अँड इंडस्ट्री यांच्यामार्फत मुंबई २५ मे रोजी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय नवउद्योजक समिट अँड वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम २०२५ या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून उपस्थित राहलेल्या आमदार सौ. श्वेताताई महाले उदयन्मुख नवउद्योजकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

स्टार्टअपला एक लोकचळवळ बनवणे गरजेचे आहे. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्टार्टअप ला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया या योजनेची सुरुवात केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी महाराष्ट्र मध्ये पोषक वातावरण तयार केले.
मेक इन महाराष्ट्र, इज ऑफ डुइंग बिजनेसच्या माध्यमातून उद्योगस्नेही राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण केली. त्याचे फलित म्हणून यंदा दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जवळपास १६ लाख कोटी रुपयाचे सामंजस्य करार केले गेले. भारताची सध्याची उद्योगस्नेही व्यापारनीती, महाराष्ट्राचे सर्वांचा विकास अभिप्रेत असलेले उद्योग स्नेही धोरण, आणि सर्व सामाजिक स्तरात एक विश्वास निर्माण करून महाराष्ट्राने देशात उद्योग व व्यापार यात मिळवलेले अग्रेसरत्व याबद्दल बोलताना चिखलीच्या आमदार सौ. श्वेता ताई महाले यांनी गौरव उद्गार काढले.
मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज बीकेसी येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय नवोद्योजक समिट व विक्रेता विकास कार्यक्रमांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून उद्योजक, नवउद्योजक स्टार्टअप्स, महिला आणि अनुसूचित जाती जमातीतील तरुण सहभागी झाले होते.
या उद्योजक, नउद्योजकांमध्ये विदर्भ विभागातील बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील प्रतिनिधींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.
या कार्यक्रमाला नॅशनल स्टॉक एक्सचेंज व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चव्हाण तसेच डॉक्टर अशोकराव माने (आमदार), त्याचप्रमाणे राज्यभरातील लघु व सूक्ष्म उद्योग करणारे उद्योजक तसेच खादी ग्रामोद्योग बोर्ड व विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्रातील २०० हून अधिक उद्योजक, उद्योग भागीदार यांचा समावेश होता.
येणाऱ्या काळात स्टार्टअप ची ही चळवळ शहरातून गावापर्यंत पोहोचवायची आहे यामध्ये देशाला अभिमान वाटेल इतका विदर्भआघाडीवर असेल याची मला खात्री आहे असेही आ. सौ. श्वेताताई महाले या वेळी म्हणाल्या.
