शहरवासियांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याची कबुलीच पालिका प्रशासनाने अप्रत्यक्षरीत्या दिली आहे. अशुद्ध पाणीपुरवठ्यासह स्वच्छता भूमिगत गटारींसह खुल्या गटारींच्या साफसफाईसह अन्य नागरी सुविधा देण्यासाठी पालिका सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरली आहे. दरम्यान
शहरातील नादुरुस्त स्थितीतील जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी १६ जानेवारीपर्यंत दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना आमदार रमेश बोरनारे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
शहरात प्रशासकराजच्या विरुद्ध अशुद्ध पाणीपुरवठा व सार्वजनिक परिसरात अस्वच्छता अशा विविध समस्यांबाबत नागरिकांतून मोठ्या प्रमाणावर ओरड सुरू आहे. तसेच १२ एमएलडी (१२० लाख लिटर) क्षमतेचे जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्राचे स्वयंचलित यंत्रात बिघाड झाल्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा केला जात नसल्याची कबुली नगरपालिका प्रशासनाने बैठकीत दिली.या विषयावर आमदार बोरनारे यांनी पाणीपुरवठा विभागाला नागरिकांना शुद्ध व दररोज पिण्यासाठी पाणीपुरवठा देण्यासाठी कोणकोणते कामे करावी लागणार आहेत? याबाबत १६ जानेवारीपर्यंत अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या.
दिवाबत्ती तसेच मंजूर तसेच प्रगतिपथावरील कामे पूर्ण करण्यासाठी बांधकाम विभागाने गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. आ.बोरनारे यांनी नगरपालिकेच्या प्रशासकांसह विभागप्रमुखांची संयुक्त बैठक घेतली. यादरम्यान त्यांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली. शहरातील सर्व भागात स्वच्छता तसेच नागरी सोयी-सुविधांचा लाभ नागरिकांना प्रभावीपणे देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. बैठकीस माजी राजेंद्र साळुंके, नगरसेवक पारस घाटे, श्रीराम गायकवाड, संजय बोरनारे , रणजित चव्हाण, प्रशांत त्रिभुवन, प्रदीप साळुंके, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. संगीता नांदूरकर यांच्यासह विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
दरम्यान में २०२३ मध्ये नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर शहरात अराजकराज सुरू झाले आहे. पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुणाची जरब नसल्याने ते बेफाम सुटले आहेत. नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असताना पालिका प्रशासनाने पूर्ण डोळेझाक केली आहे.
