पंचायत समितीच्या आमसभेत केले आवाहन!
आगामी पाच वर्षासाठी केलेला विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे :- आ. सौ श्वेताताई महाले...
माझ्या पहिल्या कार्यकाळात चिखली तालुक्यासह मतदारसंघाच्या विकासाचा भक्कम पाया रचण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला. जनतेने पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून मला दुसऱ्यांदा संधी दिली असून या संधीचे सोने करण्याचा निर्धार मी केला आहे. त्याकरिता आगामी पाच वर्षांत तालुक्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प मी केला असून त्याच्या पूर्ततेसाठी मला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन काल दि. १३ जानेवारी रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय, चिखली येथे पार पडलेल्या पंचायत समितीच्या आमसभा व सरपंच मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून सौ श्वेताताई यांनी आपले भाषण करताना केले.
या सभेमध्ये पंचायत समितीच्या विविध विभागांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामगिरीचा अहवाल सादर करण्यात आला. यावेळी ग्राम पंचायतीच्या सर्व विभागांच्या कामगिरीचा आढावा घेतला. माझ्या आवाहनावरून उपस्थित ग्रामपंचायत सरपंच यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. सरपंचांकडून उपस्थित करण्यात आलेले मुद्दे, तक्रारी व आक्षेपांचे निराकरण जातीने लक्ष घालून या सभेमध्ये केले. तसेच यापुढे कोणत्याही विभागाच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, पारदर्शक कारभार करण्यावर आपला भर राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. मनोजजी कायंदे, तहसीलदार संतोष काकडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव पायघन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मोरे, भाजप तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतीश भुतेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनंदाताई शिनगारे, माजी सभापती सिंधुताई तायडे, माजी पंचायत समिती सदस्य ज्योतीताई सिताफळे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, पीरीपाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष देव्हडे तसेच सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
