राज्य सरकार देणार सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मुख्यमंत्री फडणवीस यांचे तातडीचे निर्देश:-आ.श्वेताताई महाले.

 राज्य सरकार देणार सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मुख्यमंत्री फडणवीस यांचे तातडीचे निर्देश:-आ.श्वेताताई महाले.




सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत १२ जानेवारीपर्यंत असल्याने मोठ्या संख्येने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री पासून वंचित राहावे लागणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावा लागणार असल्याची बाब आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटून त्यांच्या कानावर घातली. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याचे मान्य केले असून त्यासंबंधीचे पत्र तातडीने आज सायंकाळपर्यंत काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याची माहिती आ. श्वेताताई महाले यांनी दिली आहे. दि. १३ जानेवारी रोजी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेप्रसंगी पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना त्या बोलत होत्या.



सोयाबीन हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मागील काही वर्षांपासून मुख्य पीक बनले आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील कास्तकार मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करतात. या सोयाबीनची खरेदी राज्य शासनाकडून पणन महामंडळाच्या माध्यमातून शासनाच्या अधिकृत खरेदी केंद्रावर केली जाते. सध्याच्या हंगामातील सोयाबीन खरेदीची मुदत ही १२ जानेवारीपर्यंत होती. परंतु, तोपर्यंत फारच कमी खरेदी शासकीय केंद्रावर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक शेतकरी आपला शेतमाल विकण्यापासून वंचित राहिल्याची वस्तुस्थिती आहे. ही बाब आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कानावर घातली असल्याची माहिती आ. श्वेताताई महाले यांनी दिली. काल शिर्डी येथे भाजपाचे प्रदेश महा अधिवेशन पार पडले. येथे उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विषयाबद्दल आपण स्वतः भेटून माहिती दिली असल्याचे त्या म्हणाल्या. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कुठलेही आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता सध्या सुरू असलेल्या सोयाबीन खरेदीला तातडीने मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. काल रविवार हा शासकीय सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्यासंबंधीचे पत्र काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिल्याचे पत्र राज्य शासनाकडून निघणार असल्याची माहिती आ. महाले यांनी यावेळी दिली. सोयाबीन खरेदी केंद्रावर निर्माण झालेली बारदाण्याची टंचाई देखील लवकरच पूर्णपणे दूर होणार असून त्यासाठी पणन महामंडळ प्रयत्नशील असून आपण सुद्धा या विषयाचा पाठपुरावा करत असल्याचे आ. श्वेताताई महाले म्हणाल्या.

Previous Post Next Post