कु. सान्वि हिंगणे ठरली विजेता तर कु. सान्वि खरात उपविजेता
बुलढाणा, २३ सप्टेंबर ः मोबाईलच्या जगात गुरफटलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देश्याने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघद्वारे आयोजित वृत्तेश्वर गणेशोत्सवांतर्गत ‘नाच रे मोरा’ बालनृत्य स्पर्धा जल्लोषात पार पडली. पहिली ते चौथी या बालगटासाठी आयोजित या बालनृत्यस्पर्धेता चिमुकल्यांनी वेगळाच रंग भरला. दर्जेदार नृत्यकलाकारांच्या या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद मिळाला. टॉप टेनमधून सात हजार रूपयांचा प्रथम पुरस्कार कु. सान्वि विशाल हिंगणे हिने पटकाविला असून कु. सान्वि खरातला पाच हजार रूपयांचा द्वितीय पुरस्कार मिळाला तर ३ हजार रूपयांचा तृतीय पुरस्कार कु. अधिरा सगळे हिने पटकाविला. कु. अधिरा नारखेडे आणि कु. स्वरूषि भालेराव यांना ५०० रूपयांची प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आली.
येथील सैनिक मंगल कार्यालयात मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी ‘नाच रे मोरा बालनृत्य स्पर्धेचे ग्रॅण्ड फिनाले झाला. तत्पूर्वी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते वृत्तेश्वराची आरती पार पडली. प्र. समाज कल्याण उपायुक्त मनोज मेरत, साधनाश्री कंस्ट्रक्शनचे गणेश जाधव, जानकीदेवी विद्यालयाचे संस्थापक शेनफडराव घुबे, नगरसेवक आकाश दळवी, आस्था बहु. संस्थेचे महेंद्र सौभागे तसेच त्यांच्या एकल महिला सदस्यांसह मान्यवरांनी वृत्तेश्वराची आरती केली. त्यानंतर बालनृत्य स्पर्धेची अंतिम फेरी झाली. ऑडीशनमधून दहा स्पर्धकांची अंतिमफेरीसाठी निवड करण्यात आली होती. या दहा स्पर्धकांमध्ये विजेतापदासाठी चांगलीच चुरस झाली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला उच्च दर्जाचा नृत्याविष्कार अनेकांना स्तंभित करणारा होता.
यात कु. सान्वी हिंगणे हिने पारंपारीक नृत्य सादर करीत देवीचा गोंधळ तसेच भक्तीगीतावर अप्रतिम नृत्य सादर केले. रंजना बोरीकर आणि मनोज नंद्रेकर यांच्या अनुभवी परीक्षणातून सान्विला विजेता घोषित करण्यात आले. टॉप टेनमध्ये कु. अधिरा बोर्डे, कु. स्वरा स्वामी, श्लोक हिवाळे, कु. आर्या जाधव आणि कु. अर्शिका पाटणकर यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सिने कलाकार कृ्रष्णा बोरीकर हिने तिच्या आगामी चित्रपटाविषयी दर्शकांसोबत संवाद साधला. तर काही गायक पत्रकारांनी करोओके गीत सादर करून स्पर्धेत वेगळाच रंग भरला. मोताळा तहसिलदार सरिता खटाळ यांनी स्पर्धेला भेट देत स्पर्धकांमध्ये उत्साह भरला.
सीईओ खरात यांचे लक्षवेधी तबलावादन
खूप कमी अधिकारी असे आहेत जे कलाप्रेमी आहे. त्यातही बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी स्वतः कलाकार सुद्धा आहेत. बुलढाणा जिल्हा परिषदेचे सीईओ गुलाबराव खरात उत्कृष्ट तबलावादन करतात. त्यांना शास्त्रीय संगीताची उत्तम जाण आहे. आपल्या या तबलावादनाचा अद्भूत नमुना त्यांनी वृत्तेश्वर गणेशोत्सवाच्या बालनृत्य स्पर्धेत सादर केला. प्रा. कोल्हे सरांनी त्यांना आपल्या गायनातून यथोचित साद दिली. जवळपास १५ मिनीट तबलावादन करून श्री खरात यांनी अनेकदा टाळ्या घेतल्या. पत्रकार मंडळी आणि उपस्थित गर्दीच्या प्रतिसादाने सीईओ खरात भारावले होते. ‘अशा कार्यक्रमांसाठी खरे तर आमंत्रणाची गरज नसते.. यात सहभाग घेणे हा मोठा आनंद असतो’, या शब्दांत सीईओ खरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

