मुंबईहून परतताच आ. महाले शेतकऱ्याच्या बांधावर; आमखेडमध्ये पिकांची पाहणी
(महेश गोंधणे)-चिखली विधानसभा मतदारसंघातील आमखेड येथे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिकांची झालेली बिकट अवस्था आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार श्वेता महाले यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मुंबईहून परतल्यानंतर वेळ न दवडता त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटीला प्राधान्य देत आमखेड गाठले.
मुंबईहून परतताना मेहकर फाट्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आमदार श्वेता महाले काही क्षण थांबल्या त्यानंतर त्यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावे, त्यांची व्यथा ऐकून घ्यावी, त्यांना धीर द्यावा आणि संकटाच्या काळात सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावा असे आवाहन केले.
“आज बळीराजाची व्यथा सर्वात मोठी आहे. त्यामुळे इतर चिल्लर गोष्टींकडे व नौटंकी करणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना आधार देणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याला आश्वस्त करावे. सरकार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि या संकटात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करा,” असे आ.श्वेताताई म्हणाल्या.
यानंतर आमदार ताईंनी थेट आमखेड येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रल्हाद वाघ यांच्या शेतावर जाऊन त्यांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कृषी अधिकाऱ्यांकडून पिकांची सद्यस्थिती,पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती आणि संभाव्य नुकसानीबाबत माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिकांची झालेली अवस्था आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून आ.श्वेता महाले यांनी त्यांना धीर दिला. “शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. संकट कितीही मोठे असले तरी सरकार शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेणे आणि त्यांच्या प्रश्नांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांची परिस्थिती जाणून घेत आहेत. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणे, त्यांना दिलासा देणे आणि संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास देण्यासाठी राज्य शासनाकडून परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला जात आहे. पंचनामे व आवश्यक मदतीबाबत शासनाकडून वेगाने कार्यवाही सुरू असून, शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन संवेदनशीलतेने काम करत आहे.चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवून त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा ऐकणे आणि संकटाच्या काळात त्यांना धीर देणे, यालाच सध्या सर्वाधिक प्राधान्य असल्याचे आ.श्वेता महाले यांनी सांगितले...
