दोषींना तात्काळ अटक करून मोक्का दाखल करावा मागणी
सिंदखेडराजा येथे गौ सन्मान आव्हान अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी पूज्य संत श्री बालकृष्ण जी महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज बुलढाणा पत्रकार भवन येथे सकल हिंदू समाज, संत समाज, गोभक्त व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
यावेळी पूज्य संत श्री बालकृष्ण जी महाराज यांनी सांगितले की, त्यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत गंभीर व जीवघेणा होता. घटनेचे व्हिडिओ उपलब्ध असून त्यामधील सर्व संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली.
आंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य संत श्री विवेक दास जी शास्त्री महाराज यांनी सांगितले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
संत श्री अमोलनंद सरस्वती जी महाराज यांनी वारकरी संप्रदाय व तेरा निर्वाणी आखाड्याचा पूज्य संत श्री बालकृष्ण जी महाराज यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार व परिस्थितीनुसार आवश्यक असल्यास मोक्का (MCOCA) सारख्या कठोर कायदेशीर तरतुदी लागू करण्याचाही विचार करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. न्याय न मिळाल्यास संत समाज शांततापूर्ण आंदोलन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमोल अंधारे (हिंदू सेवक गौरक्षक) यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत सांगितले की, पूजनीय संत श्री बालकृष्ण जी महाराज यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणातील सर्व दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान आदेशांनुसार व लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार संबंधित आरोपींवर योग्य त्या कलमांखाली गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी. आवश्यक असल्यास मोक्का सारख्या कठोर कायद्यांचाही विचार करण्यात यावा. प्रशासनाने वेळेत न्याय दिला नाही तर सकल हिंदू समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, या घटनेमुळे संत समाज, गोभक्त व धर्मप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून तपास जलदगतीने पूर्ण करावा.
सकल हिंदू समाजाने इशारा दिला की,१० जून २०२६ पर्यंत दोषींना अटक झाली नाही तर सिंदखेडराजा येथे संत समाज, गोभक्त व सकल हिंदू समाजाच्या वतीने शांततापूर्ण आंदोलन सुरू करण्यात येईल.
यावेळी पूज्य संत श्री बालकृष्ण जी महाराज, युवाचार्य संत श्री विवेक दास जी शास्त्री महाराज, संत श्री अमोलनंद सरस्वती जी महाराज, गो सन्मान अभियानाचे जिल्हा सदस्य शैलेश गोंधणे,अमोल अंधारे,गजानन महाराज सपकाळ, प्रशांत जैवाळ,प्रवीण अंभोरे , प्रमोद मापारी, शरद भाला , अशोक अग्रवाल, माधव धुंधळे, किशन महाराज तसेच विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रवीण अंभोरे यांनी आभार प्रदर्शन केले