बँकांनी कामात दिरंगाई करू नये –सौ.श्वेता महाले...
(महेश गोंधणे):-चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे रोजगार व स्वयंरोजगार योजनांबाबत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध बँकांचे प्रतिनिधी आणि जिल्हा पातळीवरील अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, अन्न प्रक्रिया उद्योग योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच ओबीसी महामंडळाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या सर्व योजनांचा लाभ ग्रामीण भागातील युवक, महिला, शेतकरी व गरजू कुटुंबांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे, अशी भूमिका आ.श्वेता महाले यांनी यावेळी मांडली.
मतदारसंघातील अनेक नागरिकांनी रोजगारासाठी बँकांकडे कर्ज प्रस्ताव दिले असून ती प्रकरणे बराच काळ प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे लाभार्थ्यांना अडचणी येत असल्याची बाब आ.महाले यांनी बैठकीत लक्षात आणून दिली. त्यामुळे बँकांनी ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढून पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी स्पष्ट अपेक्षा आ.महाले यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.
शासनाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात लोकांच्या हातात पोहोचल्या पाहिजेत, युवकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे आणि महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करता आला पाहिजे, हा विकासाचा खरा अर्थ असल्याचा दृष्टिकोन आ. सौ.श्वेता महाले यांनी बैठकीतून मांडला.
ग्रामीण भागातील सामान्य माणूस स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभा राहावा, या उद्देशाने आ. श्वेता महाले पाटील सातत्याने पाठपुरावा करत असून, ही बैठक त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, प्रमुख जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक के. के. सिंग,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन अमितकुमार दुबे, तसेच सर्वज्ञ सिंह,एस.के.गारोळे, प्रमोद लांडे, दीपक कुटे आदी मान्यवर उपस्थित होते...