चिखली पोलीस ठाण्याअंतर्गत सामान्य नागरिकांच्या तक्रारी शतप्रतिशत निकाली....
byVidarbha vandan-
(महेश गोंधणे):-चिखली सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत व प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने, मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून दिनांक २४ ते २७ डिसेंबर २०२५ दरम्यान चिखली पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामधे २ दिवसात नागरिकांकडून विविध स्वरूपाच्या प्राप्त तक्रारींची चौकशी करून कायदेशीर चौकटीत त्वरित कारवाई करण्यात येत आहे. चिखली पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराला प्रतिसाद दिला असून कौटुंबिक वाद, जमीन-विवाद, फसवणूक, सायबर गुन्हे, महिला तक्रारी तसेच किरकोळ वाद यासंबंधी अर्ज प्राप्त झाले आहेत. अनेक तक्रारींवर समुपदेशनाद्वारे तडजोड घडवून आणण्यात आली असून काही प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या शिबिरात पोलिसांकडून तक्रारदारांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले जात आहेत. चिखली पोलीस स्टेशनला आजपर्यंत एकूण ३२९ नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३२९ नागरिकांच्या म्हणजे शत प्रतिशत तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. याशिवाय एकूण १०४० गुन्हे दाखल असून त्यापैकी ९६० गुन्हे न्यायालयात दाखल करून न्यायप्रविष्ठ करण्यात आले आहे. अशा प्रकारची तक्रार निवारण शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात येणार असून, नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय आपल्या तक्रारी पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन चिखलाचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी केले आहे.या उपक्रमामुळे पोलीस प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत होत आहे. सदर शिबीर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात चिखली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.