गर्भाशयाच्या कॅन्सरची लस मोफत देणार.... ना. प्रकाश आबिटकर
चिखली(महेश गोंधणे):-प्रगत महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने अधिक घोडदौड करत असताना आरोग्य व्यवस्थेमध्ये आणखी काही उन्नती होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करून महाराष्ट्रातील मुलींना, माता भगिनींना आज भेडसावणारा मोठा प्रश्न म्हणजे गर्भाशयमुखाचा कॅन्सर (सर्व्हायकल कॅन्सर) असून याची लस सरकारने मोफत द्यावी आणि या आजाराचे निदान करण्यासाठी स्क्रीनिंग मशीन राज्यभरात सरकारने उपलब्ध करून द्याव्या अशी आग्रही मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ.सौ.श्वेता महाले यांनी विधिमंडळात उपस्थित केली.
सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या चर्चेत सहभागी होऊन राज्यभरातील माता भगिनींसाठी श्राप ठरत चाललेल्या परंतु पुरेसा चर्चेत नसल्याने व ग्रामीण भागात याबाबतीत पुरेसी जनजागृती झाली नसल्याने सध्या सुप्त पातळीवर दिसत असलेल्या गर्भाशय मुखाचा कर्करोगाच्या गंभीर प्रश्नाला आ.सौ.श्वेता महाले यांनी विधिमंडळात तोंड फोडले. या कर्करोगाची वैशिष्ट्ये सांगताना त्या म्हणाल्या की कर्करोगापूर्वी आणि सुरुवातीच्या काळात गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग असलेल्या महिलांमध्ये सहसा कोणतीही चिन्हे आणि लक्षणे नसतात. कर्करोग प्रगत अवस्थेत पोहोचल्यानंतरच चिन्हे आणि लक्षणे दिसून येतात. या समस्येचे गांभीर्य ओळखून 2020 मध्ये त्यांनी चिखली मतदारसंघात सर्व्हायकल कॅन्सरचे लसीकरण सीएसआर मधून मोफत घडवून आणले होते.
परंतु त्यावेळी पुरेसा निधी न मिळाल्याने शंभर टक्के लसिकरण होऊ शकले नाही. यासंबंधी वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली बातमी केंद्रीय मंत्री मा.नितीन गडकरी यांनी पाहिली असता त्यांनी मला बोलावून या लसीकरणाबाबत चर्चा केली आणि केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याशी बोलून मिशन इंद्रधनुष मधून हे लसीकरण मोफत राबवण्याचा मनोदय व्यक्त केला होता. याची आठवण आ.सौ.श्वेता महाले यांनी सभागृहाला करून दिली.
लक्ष्य वयोगटातील (३०-४९ वर्षे) सर्व महिलांची तपासणी करून आणि त्यानंतर आढळलेल्या कर्करोगापूर्वीच्या जखमांवर उपचार करून, लवकर निदान केल्याने बहुतेक केसेस टाळता येतात. स्क्रिनिंग मशीन हे कर्करोगापूर्वीचे आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या आणि पूर्णपणे निरोगी वाटू शकणाऱ्या महिलांमध्ये कर्करोगाचा शोध घेते. तपासणीचा महत्त्वाचा पैलू असा आहे की या टप्प्यावर कर्करोगापूर्वीचे घाव आणि सुरुवातीच्या गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग दोन्हीवर खूप यशस्वीरित्या उपचार केले जाऊ शकतात. त्यासाठी प्रतिबंध म्हणून लसीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन आ.सौ.श्वेता महाले यांनी केले.
विधिमंडळात आ.सौ.श्वेता महाले यांनी मांडलेल्या या आरोग्याशी संबंधित गहण प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितले की, हे लसीकरण एक मोहीम राबवून सरकार मोफत उपलब्ध करून देईल.तसेच प्रत्येक जिल्ह्याला स्क्रीनिंग मशीन उपलब्ध करून देण्यासाठीही सरकार पावले उचलणार आहे.