चिखली (महेश गोंधणे):चिखली विधानसभा मतदारसंघातील तीन महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांना 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने भाविकांमधे आनंदाचे वातावरण आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेच्या माध्यमातून श्री रेणुका देवी मंदिर (गोदरी), श्रीक्षेत्र मर्दडी देवी संस्थान (दुधा) आणि श्री सोमनाथ महाराज संस्थान (डोंगरशेवली) या ठिकाणांना हा दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल यांच्या मान्यतेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे.
या तिर्थक्षेत्रांना 'ब' वर्गाचा दर्जा मिळण्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी या तीर्थक्षेत्रांना 'ब' वर्ग दर्जा मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले. या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार, तसेच ग्रामविकास मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
भगवान परशुराम यांची माता म्हणून पूजली जाणारी रेणुकामाता यांचे गोदरी येथील मंदिर श्रद्धेचे केंद्र आहे. अनेक भाविक या तीर्थक्षेत्राला भेट देऊन आपल्या श्रद्धा व्यक्त करतात. त्याचप्रमाणे, निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये वसलेले श्रीक्षेत्र मर्दडी देवी मंदिर भक्तांच्या मनोभावांचे स्थान आहे. या ठिकाणी वर्षभर अनेक धार्मिक कार्यक्रम आणि यात्रेचे आयोजन केले जाते. डोंगरशेवली येथील श्री सोमनाथ महाराज संस्थान येथे सुद्धा भाविकांची भगवान शंभू महादेवाची उपासना करण्यासाठी गर्दी असते. या तीर्थक्षेत्रांना 'ब' वर्ग दर्जा मिळाल्याने त्यांच्या विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. रस्त्यांची सुधारणा, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनतळ, भक्तनिवास, परिसर सुशोभीकरण, कचरा व्यवस्थापन, पथदिवे, संरक्षण भिंती, तसेच वृक्ष लागवड यांसारख्या सुविधांमुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.