चिखली पंचायत समितीतील सिंचन विहिर घोटाळा !शेतकर्यांच्या तक्रारीनंतर जुन्या तारखेत काढला आदेश?
चिखली :-
सिंचन विहीरी वाटप घोटाळाप्रकरणी चिखली पंचायत समिती राज्यस्तरावर बदनाम झाली असून,आणखी एक धक्कादायक प्रकार शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी चव्हाट्यावर आणला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात आंदोलन करीत तक्रार दाखल केल्यानंतर, इसोली येथील उर्वरित शेतकर्यांना प्राधान्यक्रम डावलून स्थळपाहणी करण्याचे आदेश दिल्याचा विषय लावून धरला होता. तर कारवाईतून बचावासाठी आता गटविकास अधिकारी माधवराव पायघन यांनी मागील तारखेत आदेश पारित करीत, त्या उर्वरित शेतकर्यांचे स्थळ पंचनामे करून विहीर मंजुरीचा आदेश काढले खरे;परंतु आता ते ग्रामपंचायत अधिकारी यांनी ६ जानेवारीरोजी दिलेल्या लेखी खुलाशावरून अडचणीत आले आहेत.या प्रकरणी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्या दि१७जानेवारी च्या ठिय्या आंदोलना दरम्याण अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड तपासणी केल्या नंतर समोर आली आहे.
यावरून चक्क आदेशच मागच्या तारखेत केल्याचे उघड झाले असून,जोपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून मनमर्जी काम करणारे बीडीओ यांच्यावर कारवाई होत नाही,यापूर्वीच स्थळपाहणी झालेल्या व परीपुर्ण विहीर प्रस्तावांना मान्यता मिळणार नाही, तोपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याची भूमिका सरनाईक, कणखर यांच्यासह शेतकर्यांनी घेतली व ठिय्या आंदोलन सुरू केले.परंतु,वरिष्ठांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
इसोली येथील ग्रामविकास अधिकारी(सचिव) व सरपंच यांनी ग्रामसभा ठरावानुसार प्राधान्यक्रम १ ते १५ असे परिपूर्ण सिंचन विहीर प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी ठरावातील क्र. ६चा प्रस्ताव त्रृटीत काढण्यात आला होता. तर तो प्रस्ताव बाद करण्यात आला होता. तर एकूण १४ प्रस्ताव ग्रामसभा प्राधान्यक्रमे मंजुरीसाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते. यापूर्वीच या प्रस्तावांची पंचायत समितीकडून तपासणीसुद्धा झाली होती. असे असतांना गट विकास अधिकारी श्री माधवराव पायघन यांनी मनमानी कारभार करीत ठरावातील वरील ६ लाभार्थी शेतकरी यांचे नाव व प्राधान्यक्रम डावलून ८,९,१० व १५ यांचीच स्थळपाहणी करावी, असे आदेश दि.०२/०१/२०२५ रोजी ग्रामपंचायत सचिव व तांत्रिक सहाय्यक पंचायत समिती चिखली यांना काढले होते. त्याचप्रमाणे सोबतच्या यादीतील कामे तात्काळ सुरू होतील, या अनुषंगाने कारवाई करण्याचे सूचवले होते. या आदेशामुळे इसोली गावातील लाभार्थी यांनी विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांची या प्रकरणी भेट घेतली होती.या प्रकरणी ग्रामपंचायत सचिव यांनी दि. ०६/०१/२०२५ रोजीच गटविकास अधिकारी यांना गावात आपल्या आदेशामुळे वाद निर्माण झाल्याचे सविस्तर पत्रच दिले होते. परंतु, कदाचित हे बीडीओंच्या लक्षात नसल्याने बीडीओने प्राधान्यक्रम डावलून काम केल्याने जुन्या तारखेत आदेश काढला खरा; परंतु तो आदेश ग्रामपंचायत अधिकारी यांच्या लेखीपत्राने व त्यांना प्राप्त नसल्याने जुन्या तारखेत काढल्याचे स्पष्ट होत आहे.तर २ तारखेचा आदेश निघाला, अंमलबजावणी झाली परंतु ३ तारखेचा आदेश खाली पोचत नाही,यावरून बीडीओ किती पारदर्शक काम करीत आहेत, याचा पाढाच याप्रसंगी शेतकरी नेते विनायक सरनाईक, देविदास कणखर यांनी वाचला आहे.यावेळी शेतकरी नेते विनायक सरनाईक, देविदास कणखर, गोपाल ढोरे, पवन डुकरे, गजानन शेळके, रविराज टाले, प्रकाश घुबे, देविदास घुबे, गणेश देशमुख, औचितराव वाघमारे, विलास तायडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
