चिखली :(महेश गोंधणे):-चिखली विधानसभा मतदारसंघातील मौजे गोदरी येथील जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या अंतर्गत असलेला तलाव सततच्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे भरून ओव्हरफुल झाला आहे. त्यामुळे तलाव फुटून गावकऱ्यांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती.
ही गंभीर परिस्थिती लक्षात येताच चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी तात्काळ संवेदनशीलतेने परिस्थितीवर लक्ष केंद्रीत केले. त्यांनी कार्यकारी अभियंता पिंपळे यांच्याशी थेट चर्चा करून तात्काळ तलावाची पाहणी करण्याच्या व आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
तलाव दुरुस्तीकरिता तत्काळ जिल्हा नियोजन समिती निधीतून आर्थिक तरतूद व्हावी यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांना लेखी पत्र दिले असून,तलावातील सांडव्यातील पाणी सोडणे, तलावाच्या भिंतीवरील झाडे काढून टाकणे,तसेच शेतकऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही आमदार श्वेताताई महाले यांनी संबंधित विभागाला दिल्या.
त्यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शेतकरी बांधवांना धीर दिला तसेच प्रत्यक्ष कामकाज हाती घेतले.
या प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील,तालुकाध्यक्ष नीरज गायकवाड,सुरेश इंगळे (स्विय सहाय्यक), सरपंच अशोक सुरडकर,ग्रा. पं.सदस्य गणेश देशमुख, गजानन काळे,रमेश भवर, सिंचन विभागाचे खरपास,देठे,गोपाल काळे,भीमराव काळे,विनोद भवर (तंटामुक्ती अध्यक्ष), दीपक महाले,काशिनाथ बकाल,कारभारी घोलप, माधव घोलप, दौलत शेळके, नारायण बकाल आदी मान्यवर उपस्थित होते
