हुमणी अळीला आवरा, शेतकरी बांधवांना सावरा-आ.सौ श्वेताताई महाले

चिखली(महेश गोंधणे):-हुमणी अळीला आवरा, शेतकरी बांधवांना सावरा, विधिमंडळात पाॅईंट ऑफ इन्फर्मेशन द्वारे मांडली शेतीची व्यथा:  
चिखली व बुलढाणा तालुक्यात हुमणी या अळीने यंदा कहर केला असून या अळीला अटकाव करण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात,या अळीमुळे झालेल्या नुकसानीचा पीकविम्यात समावेश करावा आणि शेतकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी आज विधिमंडळात केली.
 पाॅईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून शेतीची ही व्यथा सभागृहापुढे मांडली. 
चिखली तालुक्यातील तालुक्यातील देऊळगाव घुबे, मेरा बु.,कोनड खुर्द,खंडाळा मकरध्वज,शेलगाव जहाँगीर, मुंगसरी,अन्वि,तेल्हारा,मेरा खुर्द,अंत्री खेडेकर, सोमठाणा,दिवठाणा आदी गावांमध्ये रोप अवस्थेतील पिकांची मुळे हुमणी अळी खाऊन टाकत आहे. त्यामुळे सोयाबीन उद्ध्वस्त झाले असून शेतकरी बांधवांना दुबार पेरणी करावी लागत आहे.कृषी विभागाने याची पाहणी केली आणि शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार शेतकर्‍यांनी फवारणीही केली. तरीही अळीचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. 
बुलढाणा जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमध्येही बळीराजा घोर संकटात सापडला असून शासनाने त्वरित या नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकरी बांधवांना मदत द्यावी अशी आग्रही मागणी  आ.सौ श्वेताताई महाले यांनी केली होती. 
   तसेच शासन निर्णयात किंवा पिक विमा योजनेमध्ये किड रोगाने, अळीने पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळणे संदर्भात तरतुद नाही. अशा वेळेस निसर्गाच्या प्रकोपामुळे परेशान झालेल्या शेतकऱ्याला सरकारकडून मदतीचा हात मिळणे गरजेचे असून,या भागातील शेतकरी शासनाकडे आशेने बघत आहे.असे आ.सौ.श्वेता महाले यांनी सभागृहाला सांगितले होते.
या हुमणी अळीमुळे किंवा कीड रोगामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करून विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासंदर्भात संबंधितांना आदेश देण्यात यावे अशी विनंती आ.सौ श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला केली.
 आ.सौ.श्वेता महाले यांनी विधिमंडळ सभागृहामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन या सदरात हा मुद्दा मांडला आणि राज्याचे कृषिमंत्री यांनी या मुद्द्याची लगेच दखल घेऊन आ. सौ.श्वेता महाले यांना यासंबंधी चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिले असता आ.महाले यांनीही वेळ न दवडता कृषिमंत्री यांची भेट घेऊन त्यांना या अळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे संपूर्ण विवरण केले व शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी लेखी निवेदनही दिले.
 राज्याचे कृषिमंत्री यांनीही शेतकऱ्यांच्या आवाज बनून आलेल्या आ.सौ.श्वेता महाले  यांच्या निवेदनाला प्रतिसाद दिला.आणि बुलढाण्याचे कृषी अधिकारी मनोज ढगे यांच्याशी त्वरित दूरध्वनीवरून संभाषण साधत बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले.
 कित्येक दशकापासून लाल फीतशाहीचा आरोप होत असलेल्या शासकीय कामांमध्ये आ.सौ.श्वेता महाले यांनी माहितीचा मुद्दा विधिमंडळात मांडणे, काही क्षणात कृषिमंत्र्यांचा त्यांना फोन येणे, कृषिमंत्र्यांनी परिस्थिती समजावून घेणे आणि लगेच जिल्ह्याच्या कृषी अधिकारी यांना फोन करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे असा आदेश देणे, या सर्व बाबी "आजचा दिवस माझा" या सिनेमाची आठवण व्हावी तेवढ्या तत्परतेने करण्यात आल्या त्यामुळे जनमानसात शासन, मुख्यमंत्री,मंत्री मंत्रिगन, व लोकप्रतिनिधी यांच्या बद्दल विश्वासाची भावना तयार होत आहे.अशी भावना यावेळी आ.सौ.श्वेताताई महालेनी व्यक्त केली

Previous Post Next Post